नवी दिल्ली - चहा विकण्यावरुन काँग्रेस पक्षाकडून खिल्ली उडवण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेदरम्यान काँग्रेसवर सणसणीत टीका केली आहे. हो मी चहा विकला, पण देश नाही विकला अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला सुनावलं आहे. आपण गरिब कुटुंबातून असल्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते नेहमीच आपला तिरस्कार करतात अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली आहे.
'माझ्या गरिब पार्श्वभुमीमुळे काँग्रेस मला नापसंद करतं. एखादा पक्ष इतका खालच्या स्तराला जाऊ शकतो का ? हो गरिब कुटुंबातील एक व्यक्ती पंतप्रधान झाला आहे. यावरुन झालेला संताप ते लोक लपवू शकलेले नाहीत. हो मी चहा विकला, देश विकलेला नाही', असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. गुजरातमधील राजकोटमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबतचा एक फोटो काँग्रेसचे ऑनलाईन मॅगझिन युवा देशने ट्विट केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील संभाषणाचे मीम तयार करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'विरोधीपक्ष आपल्यावर कशा पद्धतीचे मेमे बनवतात, असे सांगत आहेत. तर त्याला मेमे नाही तर मीम म्हणतात असे ट्रम्प यांनी मोदीं सांगितले. तर थेरेसा मे मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना 'तुम्ही चहाच विका' असे अपमानास्पद व वादग्रस्त मीम तयार करण्यात आले. काँग्रेसची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागली. त्यानंतर काँग्रेसनं तातडीने हे ट्विट डिलीट केलं.
काँग्रेसने हाफिज सईदच्या सुटकेचा आनंद साजरा केला -याआधी भूज येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेसने पाकिस्तानी दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटेकेचे सेलिब्रेशन साजरे केले असा आरोप केला.
लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफिज सईदची सुटका हे मोदी सरकारचे कुटनितीक अपयश आहे अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली होती. त्याला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसने हाफिज सईदच्या सुटकेचा आनंद साजरा केल्याचा आरोप केला. पाकिस्तानी कोर्टाने पाकिस्तानी दहशतवाद्याची सुटका केली आणि काँग्रेस या सुटकेचा आनंद साजरा करत आहे. मला याचे आश्चर्य वाटते. हीच काँग्रेस स्वत:च्या लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास ठेवत नाही पण चीनच्या राजदूतावर विश्वास ठेवते असा आरोप मोदींनी केला.
डोकलाममध्ये आपले सैन्य 70 दिवसांपासून चीनच्या नजरेला नजर भिडवून उभे होते. त्यावेळी तुम्ही चिनी राजदूतांना मिठी का मारली ? असा सवाल मोदींनी विचारला.