ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - मुंबईवरील २६/११ चा हल्ला पाकिस्तान्यांनीच केला आणि त्याचं नियोजन पाकिस्तानमधूनच झालं असं अखेर पाकिस्तानच्याच तपास पथकाच्या माजी प्रमुखाने मान्य केले आहे. तारीक खोसा, जे पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचे प्रमुख होते आणि या त्यांनी मुंबईवरील हल्ल्याच्या तपासाचे कार्य केले होते. या हल्ल्यामध्ये १६६ जणांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला पाकिस्तानने तोंड द्यायला हवे आणि सत्य स्वीकारतानाच झालेल्या चुकांचीही कबुली द्यायला हवी असे स्पष्ट मत खोसा यांनी नोंदवले आहे.
सिंध प्रांतातल्या थट्टाजवळ दहशतवाद्यांचा प्रशिक्षणतळ होता आणि तिथे लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले आणि सागरी मार्गाने ते भारतात गेले, हा घटनाक्रम तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचे खोसांनी एका लेखात म्हटले आहे. मुंबईला जी स्फोटके धाडण्यात आली त्यांचे खोके या प्रशिक्षणतळावर मिळाल्याचेही ते नमूद करतात.
अजमल कसाब हा पाकिस्तानी होता, तो कुठल्या शाळेत गेला, रहायचा कुठे आणि तो एलईटीमध्ये दाखल झाला अशा सगळ्या गोष्टीही पाकिस्तानी तपास पथकाने शोधल्याचे खोसा यांनी नमूद केले आहे.
कसाब व त्याच्या सहका-यांनी ज्या डिंगीतून प्रवास केला ती डिंगी व तिचे इंजिन कराचीमधल्या एका दुकानातून विकत घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे. या इंजिनसाठी पैसे कुणी दिले हे शोधून पाकिस्तानने त्या व्यक्तीसही अटक केले आहे. इतकंच नाही तर या दहशतवाद्यांशी पाकिस्तानमधल्या कुठल्या ठिकाणाहून संवाद साधण्यात येत होता त्यासाठी इंटरनेटची कुठली यंत्रणा वापरली याचा छडाही पाकिस्तानी तपास संस्थेने लावल्याचे कोसा यांनी म्हटले आहे.
झकीर उर रेहमान लखवी आणि अन्य सहा जणांना अटकही झाली असून खूप दीर्घकाळ या खटल्याचे काम सुरू असून याप्रकरणी न्याय मिळण्याची खात्री पाकिस्तानने द्यायला हवी अशी सूचनाही खोसा यांनी केली आहे.
एकमेकांवर दुगाण्या झाडण्यापेक्षा भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या कायदेतज्ज्ञांनी एकत्र बसून मार्ग काढायला हवा अशी सूचनाही खोसांनी केली आहे. या प्रकरणात अनेक आरोपी फरार असल्याचेही खोसांनी या लेखात म्हटले असून त्यांना पकडायला हवे त्याखेरीज हा खटला अंतिम परीणाम गाठू शकत नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.