नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमथुरा येथून 'स्वच्छता ही सेवा' अभियान 2019 चा शुभारंभ केला. या अभियानंतर्गत प्लास्टिक कचरा जागरुकता आणि प्रबोधनपर विषय जोर देण्यात आला आहे. 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. भारताला प्लास्टीक कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी या अभियानावर अधिक जोर दिला आहे. तसेच घर, कार्यालय आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणांना सिंगल युज प्लास्टिकपासून मुक्त करण्याचं आवाहनही मोदींनी केलं आहे.
मोदींनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'स्वच्छता ही सेवा' या टॅगलाईनसह मोदींनी प्लास्टीकचा वापर न करण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, मोदींच्या या व्हिडीओला पाहिल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. तसेच, मोदींच्या या ट्विटवर कमेंट देताना, अनेकांनी मोदींचं कचऱ्यात बसणं हा देखावा असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या व्हिडीओला पाहिल्यानंतर अनेकांनी कचऱ्याचा ढीग असलेले फोटो शेअर करत मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदीजी, रेट कारेपट अंथरुन कचरा साफ करतायंत, खरंच कचरा साफ करायला बसायचंय तर येथे बसावं, असंही म्हटलंय.
मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओसोबत आवाहनही केलंय. प्लास्टीकच्या वापरामुळे पर्यावरण, पशू आणि जलचर प्राण्यांना त्रास होतो. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडताना प्लास्टीकऐवजी कपड्याच्या किंवा जूटच्या पिशव्यांचा वापर करावा. तसेच, कार्यलयात पाणी पिण्यासाठी धातुचा किंवा मातीच्या भांड्यांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. तसेच, आपल्या परिसरातील प्लास्टीकला एकत्रित आणून प्रशासनामार्फत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मोदींनी म्हटले आहे.
रेड कार्पेटवरील कचऱ्यामुळे मोदींना टारगेट करण्यात येत आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या मुथरा येथे 'स्वच्छता ही सेवा' अभियानाच्या ठिकाणी प्लास्टीक कचरा गोळा करण्यात आला होता. या गोळा केलेल्या कचऱ्याचं वर्गीकरण करुन त्याची मशिनच्या सहाय्याने विल्हेवाट लावण्यात येत होती. त्यामुळे मोदी हे कचऱ्याची सफाई करत नसून, तेथे बसून प्लास्टीकचं वर्गीकरण करणाऱ्या स्त्रियांचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, वेगळ्याच पद्धतीनं तुलना करुन मोदींना ट्रोल करण्यात येत आहे.