सतना, दि. 13 - मध्य प्रदेशच्या शिवराज सिंग चौहान सरकारने एक नवा वादग्रस्त आदेश जारी केला आहे. शिवराज सरकारमधील शिक्षण मंत्री विजय शाह यांनी हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सतना येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता हजेरीच्या वेळी यस सर-यस मॅडमच्या ऐवजी जय हिंद बोलावं लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे.
सतना जिल्ह्यात हा प्रय़ोग यशस्वी झाला तर शिवराज सिंग चौहान यांच्या परवानगीने राज्यभरात हा आदेश लागू केला जाईल. सतनामधील खासगी शाळांवर हा आदेश लागू करण्यासाठी बळजबरी केली जाणार नाही असं विजय शाह म्हणाले. पण जय हिंदचा संबंध देशभक्तीसोबत असल्याने त्या शाळादेखील हा आदेश लागू करतील अशी अपेक्षा यावेळी विजय शाह यांनी व्यक्त केली.
आगामी काळात मध्य प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांशी या आदेशाला जोडून पाहिलं जात आहे. मध्य प्रदेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून मात्र अजूनपर्यंत यावर काही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. यापूर्वी वंदे मातरम् वरून देखील वाद झाला होता. शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ची सक्ती करण्यावरुन हा वाद झाला होता. त्यावेळी ‘वंदे मातरम् म्हणणे हा वैयक्तिक मुद्दा असल्याचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले होते. ‘ज्यांना वंदे मातरम् म्हणायचे नाही, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही,’ असेदेखील त्यांनी म्हटले होते.
महाराष्ट्राच्या विधानसभेतही वंदे मातरम् चा वाद बराच गाजला होता. भाजपाच्या आमदारांच्या ‘वंदे मातरम’च्या सक्तीच्या मागणीला त्यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार विरोध केला होता.
काय झालं होतं विधानसभेत- औचित्याच्या मुद्द्यावर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या देशात राहून वंदे मातरम गायला विरोध केला जातोय. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल असं गोटे बोलले होते. यावर आझमींनी उत्तर देण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. अबू आझमी वेलमध्ये उतरले. दोन्ही बाजूंनी आमदारांच्या घोषणा सुरू होत्या.
यानंतर आझमी यांनी इतिहासाचा दाखला दिला होता, 'देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं, या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहिले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानाच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते ? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते ? त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही', असं आझमी बोलले होते.
यानंतर एकनाथ खडसेंनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला होता. 'देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे. तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला,मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलेच पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ? असं म्हणत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', असं ठणकावलं होतं.
दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाने सर्व सरकारी शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये मध्ये वंदे मातरम बोलणं सक्तीचं केलं आहे. आठवड्यातून एकदा तरी वंदे मातरम बोलणं सक्तीचं करण्यात आलं आहे.