नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (गुरुवारी) त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची देखील गृहमंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे.
ममता बॅनर्जींना केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींची कट्टर विरोधक म्हणून ओळखिले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील दोघांमध्ये अनेकवेळा शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. त्यानंतर बुधवारी नरेंद्र मोदींची भेट घेऊन पश्चिम बंगालमधील तसेच जगातील दुसऱ्या कोळसा खाणीच्या उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याने आश्र्चय व्यक्त केले जात होते. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर अमित शहा यांना देखील भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी वेळ दिला तर मी उद्याही त्यांना भेटण्यास तयार असल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले होते. त्यानंतर आज त्यांनी अमित शहांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.
ममता बॅनर्जींनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आसाम मधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (NRC) यादीमध्ये अनेक अधिकृत नागरिकांचे वगळले आहे. या यादीमधून वगळलेल्या नागरिकांची संख्या जवळपास 19 लाख असून यामध्ये बंगाली भाषा बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर हिंदी भाषा आणि गोरखा भाषा बोलणाऱ्या नागरिकांचा देखील समावेश असल्याने या संबंधित चर्चा झाली असल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शहांनी या संबंधित प्रश्नांवरील समस्या नीट समजून घेतल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसंबंधीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पंतप्रधानांना जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कोळसा खाणीचे उद्घाटन करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगाल राज्यासाठी केंद्र सरकारकडे 13500 कोटींची मागणी करण्यात आली असून राज्याचे नाव बदलण्याची मागणी देखील या भेटीमध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदींना कुर्ता आणि मिठाई भेट म्हणून देण्यात आली होती.