नवी दिल्ली - देशाच्या जुन्या संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या घटनेच्या २२ वर्षानंतर म्हणजेच १३ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा नव्या संसदेत घुसकोरीची घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तर, देशाच्या संसद भवनातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या सुरक्षेवरुन देशाच्या सीमारेषेवरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. तर, आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी, चारही आरोपींवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री आज संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. पोलिस तपासाबाबत गृहमंत्री अमित शाह दोन्ही सभागृहात माहिती देणार आहे. तत्पूर्वी संसदेतील घुसकोरीवरुन खासदार संजय राऊत यांनी देशाच्या सीमारेषांवरील घुसकोरीचा प्रश्न उपस्थित केला.
देशाच्या संसदेतील सुरक्षेत अशाप्रकारे गोंधळ उडत असेल, तर देशाची सुरक्षा आणि सीमारेषेवरील स्थिती आपण समजू शकतो. लडाखने चीनच्या सैन्याने कशारितीने घुसकोरी केली, काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसकोर कशारितीने घुसकोरी करत असतील हे काल देशाना कळालं. मणीपूरमध्ये बाहेरुन दहशतवादी कसे आले असतील हे काल लक्षात आलं, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी संसद भवनातील घुसकोरीवर बोलताना देशाच्या सुरक्षांचा आणि सीमारेषांचा प्रश्न उपस्थित केला.
देशाच्या संसदेची सुरक्षा, जिथे चोख बंदोबस्त असतो. त्या संसदेत काही मुलं घुसली, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र नव्हती ते ठिक. पण, सभागृहात त्यांनी उड्या मारल्या, गोंधळ निर्माण झाला. देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान गप्प आहेत, हे सरकार गेल्या महिनाभरापासून निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, मुख्यमंत्री ठरवण्यात व्यस्त आहे, शपथग्रहणमध्ये व्यस्त आहे आणि देशाची सुरक्षा हवेत आहे, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.
हल्लेखोरांचे म्हणणे काय?
चौकशीदरम्यान अमोलने सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनासारख्या मुद्द्यांवर आपण नाराज आहोत. मणिपूरचे संकट, बेरोजगारी हे मुद्देही आहेत. म्हणूनच आपण हे पाऊल उचचले.
आयबीने दिला होता अलर्ट
इंटेलिजन्स ब्युरोने केंद्रीय तपास यंत्रणा व सरकारला अलर्ट दिला होता. कॅनडातील अतिरेकी पन्नू हा भारतातील संसदेवर हल्ला करू शकतो, असे म्हटले होते.