मुंबई : पूर्वी दुर्लक्षित समजले जाणारे योग आणि आयुर्वेद आज संपूर्ण मानवतेसाठी नवी आशा बनले आहेत. संपूर्ण जग आता आरोग्य आणि निरोगीपणाचा जागतिक सण म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. गोव्यातील धारगल येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गाझियाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन आणि नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथीचे उद्घाटनही केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, "मला खात्री आहे की या तीन संस्था आयुष आरोग्य सेवा प्रणालीला नवीन चालना देतील. आयुर्वेद हे असे ज्ञान आहे, ज्याचे उद्दिष्ट सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे संतु निरामय: आहे. याचा अर्थ सर्वांचे सुख आणि सर्वांचे आरोग्य."
याचबरोबर, "आयुर्वेद उपचारांच्या पलीकडे जाऊन कल्याणबद्दल बोलतो आणि कल्याणाला प्रोत्साहन देतो. जग देखील आता सर्व बदल आणि ट्रेंडमधून बाहेर पडत आहे आणि जीवनाच्या या प्राचीन तत्त्वज्ञानाकडे परत येत आहे. यासाठी भारतात काम सुरू झाल्याचा मला आनंद आहे. आयुर्वेद परिषदेत 50 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.", असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, "ज्ञान, विज्ञान आणि सांस्कृतिक अनुभवाने जगाच्या कल्याणाचा संकल्प हे अमृत कालचे मोठे ध्येय आहे. यासाठी आयुर्वेद हे प्रभावी माध्यम आहे. भारत यावर्षी G20 समुहाचे यजमान आणि अध्यक्षपद भूषवत आहे. आम्ही G20 शिखर परिषदेची थीम एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ठेवली आहे.
तसेच, आयुर्वेदाबाबत नरेंद्र मोदी म्हणाले, "आमच्याकडे आयुर्वेदाचे परिणाम तसेच प्रभाव दिसून आला, पण पुराव्याच्या बाबतीत आम्ही मागे पडलो. त्यामुळे 'डेटा बेस्ड एव्हिडन्स'चे दस्तावेजीकरण करणे आज आपल्यासाठी अनिवार्य झाले आहे. त्यासाठी दीर्घकाळ सतत काम करावे लागेल."