नवी दिल्ली : केंद्र सरकारद्वारे संचालित शाळांमध्ये इयत्ता ६वी ते १० वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात आता योग विषयाचा समावेश होणार आहे. या विषयाअंतर्गत सरतेशेवटी १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. प्रात्यक्षिकाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध आसने करावी लागतील. अर्थात हा विषय कोणत्या शैक्षणिक सत्रापासून समाविष्ट केला जाईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. देशातील सर्व केंद्रीय विद्यालये आणि जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये इयत्ता ६वी ते १०वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात योग विषय समाविष्ट केला जाईल. अर्थात या विषयाचा विद्यार्थ्यांवर कुठलाही अतिरिक्त ताण पडणार नाही. कारण या विषयाअंतर्गत ८० गुण प्रात्यक्षिकासाठी आणि केवळ २० गुण लेखी परीक्षेसाठी असतील. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही योग विषयाचा समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शाळांमध्ये योगवर्ग
By admin | Published: June 23, 2015 2:59 AM