ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - जगभरात विविध देशांमध्ये उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात असतानाच काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाने सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सामूहिक योग शिबीराचे आयोजन म्हणजे तमाशा असून जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे अशी बोचरी टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
रविवारी दिल्लीतील राजपथासह सर्वच राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे मोदी सरकारवर टीका केली. मी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा देतो. पण जनतेच्या पैशातून आयोजित सामूहिक योग शिबीरांचा विरोध करतो, यातून जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असून मोदींची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे असे ट्विट त्यांनी केले आहे. तर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीदेखील ट्विटरवरुन भाजपा नेत्यांवर टीका केली. यादव म्हणाले, शरीर स्वास्थ्य नव्हे तर हा राजकीय 'योग' आहे, देशातील कामगार, रिक्षाचलक या कष्टकरी वर्गाला योगाची आवश्यकता नाही, मोदी सरकार त्यांचा प्रचार करत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. भारतात योग वर्षानुवर्ष सुरु असून भाजपाचा हा प्रयत्न दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे शनिवारी रात्री उशीरा परदेशात गेल्याचे समजते.