नवी दिल्ली- योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांची पंचजली आयुर्वेद कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पंतजलीच्या उत्पादनावर पुढील महिन्याची उत्पादन तारीख छापल्याचा कंपनीवर आरोप करण्यात आला आहे. मार्च महिन्यात बाजारात विक्रीसाठी आलेल्या एका वस्तूवर एप्रिल 2018 ही उत्पादन तारीख छापण्यात आली. सोशल मीडियावर लोकांनी त्या उत्पादनाचे फोटो पोस्ट करून हा दावा केला आहे. भारतीय खाद्य नियामक संस्थाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने बाबा रामदेव व पतंजली कंपनीला चांगलंच धारेवर धरलं.
पतंजलीच्या एका औषधाच्या डब्यावर एप्रिलची उत्पादन तारीख होती. पण तो औषधाचा डबा मार्चमध्ये बाजारात आला होता, असं एका ट्विटर युजरने म्हटलं आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सने औषधाच्या या डब्याचा फोटो शेअर कर एफएसएसआय आणि डब्ल्यूएचओला टॅग केलं.
दरम्यान, पतंजलीने मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आरोप खोटे असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. औषधाच्या डब्यावरील तारीख फोटोशॉप करून टाकली आहे, असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे.