पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (petrol diesel prices increases) बुधवारी ८० पैशांनी वाढ करण्यात आली. सलग नवव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारच्या वाढीबरोबरच डिझेलने देशात अनेक ठिकाणी शंभरी पार केली. आता नव्या दरानुसार मुंबईत (petrol diesel prices in mumbai) एक लिटर पेट्रोलची किंमत ११६.७२ रुपये झाली, तर डिझेल १००.९४ रुपये प्रतिलिटर झाले. गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत एकूण पाच रुपये ६० पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्यामुळे महागाईही वाढतेय आणि त्याने सामान्य जनता बेजार झाली आहे. याबाबत योग गुरू रामदेव बाबा यांना प्रश्न विचारला असता त्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हरयाणा येथे एका कार्यक्रमात रामदेव बाबा आले होते, त्यावेळी एका पत्रकाराने त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली. त्यावेळी ते असे म्हणाले होते की, ४० रुपये प्रती लिटर आणि ३०० रुपये घरगुती गॅस देणाऱ्या सरकारला मतदान करा. त्यावरून पत्रकाराने सध्याच्या पेट्रोल व घरगुती गॅस किमतीबाबत त्यांचे मत विचारले. त्यावर ते संतापून म्हणाले, हो मी हे म्हणालो होतो, मग तू काय करशील?. मला असे प्रश्न विचारू नकोस, मी तुझ्या प्रश्नांची उत्तर देणारा ठेकेदार नाही. गप्प बस. पुन्हा हा प्रश्न विचारलास तर चांगलं होणार नाही.''
याच कार्यक्रमात ते म्हणाले होते की, सरकार चालवण्यासाठी कर घ्यावा लागेल. महागाई आहे तर काही उत्पन्न वाढवावे लागेल. अधिक मेहनत करावी लागेल. मी संन्यासी असूनही १८-१८ तास काम करतो. इतर लोकही काम करतील तर कमावतील आणि महागाईही सहन करतील. देशाची प्रगती होईल