नवी दिल्ली : अ.भा. मुस्लिम वैयक्तिक कायदे मंडळाने हरकत घेतल्याच्या पार्श्वभूमीवर योगाला विरोध करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची यांनी मंगळवारी येथे करताच नव्या वादाची भर पडली आहे.साध्वींनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनाही सोडले नाही. योगदिनी राजपथावरील मुख्य कार्यक्रमाला अन्सारी यांनी राजशिष्टाचारानुसार निमंत्रण नसल्यामुळे हजेरी लावली नव्हती. तेथे निमंत्रणाची वाट पाहण्यासाठी एखाद्या राजकारण्याच्या मुलीचे लग्न नव्हते, असा शेरा साध्वींनी मारला. त्या मुस्लीम मंडळाच्या विरोधाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, त्यांनी भारताच्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेले राहावे. कोणताही आक्षेप घेण्याची गरज नाही. त्यांचा आक्षेप असेल तर पाकिस्तानात जावे. त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. (प्रतिनिधी)