ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - केंद्र सरकारच्या अखत्यारित चालणा-या सर्व विद्यालयांमध्ये ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी योगा विषय सक्तीचा असेल अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. शिक्षकांच्या अभ्यासक्रमातही योग प्रशिक्षण दिले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्मृती इराणी यांनी सोमवारी दिल्लीत योगा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय जाहीर केला. इराणी म्हणाल्या, योगा विषयाचा विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव येणार नाही कारण यातील ८० गुण हे प्रात्यक्षिकांसाठी असतील. पुढील वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर योग स्पर्धा घेतली जाईल व या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्याला ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.
योगाची वाढती मागणी बघता योगाशिक्षकांसाठी अभ्यासक्रम राबवण्याचा सरकारचा विचार आहे. यात योगा विषयात पदवी, पदव्यूत्तर, डिप्लोमा कोर्स सुरु केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून सीबीएसई शाळांमध्ये अद्याप याविषयी कोणतेही धोरण तयार करण्यात आलेले नाही असे अधिका-यांनी सांगितले.