नवी दिल्ली - नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होत आहे. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच योगासने करुन देशवासीयांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, योग दिन हा विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा दिवस असल्याचे मोदींनी म्हटले. त्यासोबतच, आपल्या सृदृढ आयुष्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगता कोरोनावर मात करण्यासाठी योगासने करण्याचेही मोदींनी सूचवले.
‘योगा अॅट होम, योगा विथ फॅमिली’ (घरच्या घरी योग, परिवारासोबत योग), असे यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य आहे. २१ जून रोजी सकाळी ७ वा. लोक या आभासी समारंभात आपापल्या घरूनच सहभागी होऊ शकतील. विदेशातील भारतीय दूतावासांकडून लोकांना डिजिटल माध्यमातून योग दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यासाठी योग संस्थांची मदत घेतली जात आहे. यंदाच्या योगदिनी लेह येथे मोठा कार्यक्रम घेण्याची तयारी आयुष मंत्रालयाने केली होती. तथापि, साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी घेतला होता.
दरम्यान, ‘जगभरातली उच्चतम प्रतीची मानवी प्रज्ञा ‘शस्रे’ आणि ‘औषधे’ या दोन गोष्टींची अत्याधुनिक रूपे शोधून काढण्यात गुंतलेली असावी, हे अतिशय दुर्दैवी आहे. एक गोली बाहरसे मारती है, दुसरी गोली अंदरसे खोकला बनाती है.. हे कधीतरी थांबवावे आणि जगाला सुख-शांतीच्या, निरामय आरोग्याच्या सम्यक मार्गावर घेऊन जावे, असा विचार जगभरातली सुज्ञ माणसे आतातरी करणार की नाही?’ - असा सवाल योगगुरु बाबा रामदेव यांनी विचारला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने लोकमत वृत्तसमूहाच्या वतीने आयोजित ‘लोकमत : योगायुग’ या विशेष वेब-संवादात ते बोलत होते. रोझरी फाउण्डेशन पुणे हे या वेब-संवादाचे विशेष प्रायोजक होते.कोविड-१९ साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होणार आहे.