लखनौ: काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होताच योगी आदित्यनाथ त्यांनी केलेल्या एका कामामुळे चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावर असलेल्या नेत्याचा ताफा मोठा असतो. त्यांच्या ताफ्यासाठी सामान्यांच्या वाहनांना थांबवले जाते, पण उत्तर प्रदेशात याच्या उलटे दृष्य पाहायला मिळाले.
रस्त्यावरील वाहतूक बंद होतीपोलिस उपायुक्त (वाहतूक) सुभाष चंद्र शाक्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ताफा लखनौच्या हजरतगंजहून बंदरिया बागकडे रवाना होणार होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याने त्या मार्गावरील वाहतूक सामान्य प्रक्रियेनुसार बंद करण्यात आली होती. यादरम्यान ट्रॅफिकमध्ये एक रुग्णवाहिका अडकली.
रुग्णवाहिकेला जागा दिलीमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ती एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि आपला ताफा थांबवून त्या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा करुन दिली. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे.