Yogi Adityanath, Congress: काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भगव्या कपड्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हुसेन दलवाई यांनी हे वक्तव्य केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. पुढील महिन्यात लखनौ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटसाठी देशातील बड्या उद्योगपतींना आमंत्रित करण्यासाठी ते मुंबईत पोहोचले आहेत. या दरम्यान, काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी योगींच्याबाबतीत एक विधान केलं आहे.
"योगीजी, आदित्यनाथ तुम्ही कायम भगवे कपडे घालता. पण आता तुम्ही थोडं बदलायला हवं. तुम्ही रोज दररोज धर्माबद्दल बोलू नका, भगवे कपडे घालू नका. नवीन विचार आचरणात आला, थोडे आधुनिक कपडे परिधान करा आणि आधुनिक विचारांचा अवलंब करावा," असे दलवाई म्हणाले. "योगींनी महाराष्ट्रातून उद्योग नेण्याऐवजी राज्यात नवीन उद्योग विकसित करावेत. महाराष्ट्राने उद्योगांसाठी चांगल्या सुविधा दिल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातून उद्योग घेण्याऐवजी राज्यात नवीन उद्योग विकसित करा. उद्योग हे आधुनिकतेचे प्रतीक असल्याने मुख्यमंत्र्यांनी थोडी आधुनिकता स्वत:मध्येही आणली पाहिजे," असेही दलवाई म्हणाले.
या दरम्यान मुंबईत पोहोचलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्यांच्या राज्यातील लोकांना आता 'उत्तर प्रदेशचे रहिवासी' असल्याचा अभिमान वाटतो. पाच वर्षांपूर्वी पर्यंत ही परिस्थिती अशी नव्हती. मुंबईत स्थायिक झालेल्या उत्तर प्रदेशातील लोकांना संबोधित करताना योगी म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे लोक देशात किंवा परदेशात कुठेही आपली ओळख सहसा उघड करत नव्हते, ते त्यांचे मूळ गाव वगैरे लपवत होते. आपल्या जन्मभूमीबद्दलही बोलत नव्हते. पण आता राज्यातील लोकांना त्यांच्या जन्मभूमीचा अभिमान वाटतो याचा मला आनंद आहे. आता लोकांना लाज किंवा संकोच वाटत नाही. ते स्वतःला उत्तर प्रदेशचे रहिवासी म्हणवतात. म्हणूनच उत्तर प्रदेशातील २०२२च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपा सलग दुसऱ्यांदा राज्यात सत्तेवर आला."
"राज्यात पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर पक्ष दोन तृतीयांश बहुमताने सत्तेत परतला असे हे पहिल्यांदाच घडले आहे. माझ्या सरकारने केलेल्या कामामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झाले. उत्तर प्रदेश सरकारने गेल्या पाच वर्षांत प्रत्येक भागातील लोकांच्या कल्याणासाठी काम केले आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेत आहोत," असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.