लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगामी ताजमहल दौ-यापूर्वी हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहलमध्ये शिव चालीसाचं पठण केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (23 ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. दरम्यान, सीआयएसएफच्या जवानांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि केलेल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून घेतल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 26 ऑक्टोबरला नियोजित आग्रा दौरा आहे. येथे जवळपास 30 मिनिटं ते ताज महलात थांबवणार आहेत. दरम्यान, यापूर्वीच सोमवारी (23 ऑक्टोबर) अलिगड आणि हाथरसमधील काही हिंदूवादी संघटनेचे कार्यकर्ते ताजमहल येथे दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ताज महलात पोहोचल्यानंतर या कार्यकर्त्यांनी मोबाइलच्या मदतीनं शिव चालीसेचं पठण करण्यास सुरुवात केली. सीआयएसएफ कर्मचा-यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीनं या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास त्यांनी सुरुवात केली. यानंतर माफीनामा लिहून घेतल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, यासंबंधीचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ (आग्रा) विक्रम भुवन यांनी सांगितले की, ताज महलमध्ये प्रत्येकाचे मोबाइल तपासले जात नाहीत. ज्यावेळी ही घटना त्यावेळी हिंदूवादी संघटनेचे कार्यकर्ते मोबाइलमध्ये काहीतरी पाहत होते. यादरम्यान, सीआयएसएफ जवानांची त्यांच्याकडे लक्ष गेले आणि त्यांनीच स्वतःहून सांगितले की आम्ही शिव चालीसेचं पठण करत आहेत. यानंतर चूक स्वीकारल्यावरच या सर्वांना सोडण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत ताज महलवरुन बरेच वादविवाद सुरू आहेत.