ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे लोककल्याण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती सोपवण्यात आली आहेत. तर मोहसीन रजा अल्पसंख्याक मंत्री, स्वाती सिंग यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. चेतन चौहान यांची क्रीडामंत्रिपदी, तर दिनेश शर्मा यांची उच्च शिक्षण मंत्रालयपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सूर्य प्रताप शाही यांच्याकडे कृषी मंत्रालय, तर स्वामी प्रसाद मौर्य यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी गृह आणि जनसंपर्क मंत्रालय स्वतःकडेच ठेवलं आहे. तसेच, रिटा बहुगुणा-जोशी यांच्याकडे बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपविली आहे. श्रीकांत शर्मा यांच्याकडे ऊर्जा आणि राजेश अगरवाल यांच्याकडे वित्तमंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळविल्यावर भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या 21व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड भाजपाकडून एकमताने करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. लखनऊमधील काशीराम मेमोरिअल मैदानावर आदित्यनाथ यांच्यासोबत जवळपास 43 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल राम नाईक यांनी योगी आदित्यनाथ यांना पद आणि गोपनीयेतची शपथ दिली होती. एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते.
योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
By admin | Published: March 22, 2017 5:26 PM