अयोध्येतील राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामधून रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. आज संपूर्ण देश राममय झाला आहे. असं वाटतंय की आम्ही त्रेतायुगाच आलोय. आज आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही जिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, तिथंच आज मंदिर उभं राहिलंय.
उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामललांचा जयजयकार केला. योगी म्हणाले की, रामोत्सवाच्या या पावन प्रसंगी मी सर्वांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतो. आज मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शद्ब सूचत नाही आहेत. आज अशा ऐतिहासिक आणि पावन प्रसंगी भारताचं प्रत्येक शहर आणि प्रत्येक गाव अयोध्या धाम बनलं आहे. प्रत्येक मार्ग अयोध्येतील जन्मभूमीच्या दिशेने येत आहे. प्रत्येक नेत्र समाधानाच्या अश्रूंनी भिजलेले आहेत. संपूर्ण देश राममय झालाय. असं वाटतंय की, आम्ही त्रेतायुगात आलोय. आज रघुनंदन, राधव आणि रामलला आपल्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत.
योगी पुढे म्हणाले की, आजचा दिवस माझ्या वैयक्तिक जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. श्री राम जन्मभूमी मुक्तीच्या संकल्पामुळेच मला महंत अवैद्यनाथ यांचा सहवास प्राप्त झाला. श्रीराम जन्मभूमी मुक्ती महायज्ञ सनातन आस्था आणि विश्वासाचा परीक्षाकाळ होता. तसेच त्यामधून भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधण्याचा हेतूही साध्य झाला. श्रीरामजन्मभूमी मंदिराची स्थापन भारताच्या सांस्कृतिक पुनर्गठनाचं आध्यात्मिक अनुष्ठान होतं. तसेच हे राम मंदिर आणि येथील श्री रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रीय गौरवाचा ऐतिहासिक प्रसंग आहे. जिथे हे राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. तिथेच हे मंदिर उभं राहतंय, याचा आम्हाला आनंद आहे.