मुंबई: मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. तसेच वृक्षतोडण्यास विरोध करण्याऱ्या पर्यावरण प्रेमींवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे राज्यातील पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले. तर दूसरीकडे उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये साध्या चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी 63 हजार झाडे कापणार असल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौमध्ये 'डिफेक्स्पो' प्रदर्शन ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कार्यक्रमामध्ये नौदल, पायदळ तसेच अंतर्गत सुरक्षेशी संबंधित असणारे शस्त्र पाहायला मिळणार आहे. मात्र या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने जवळपास 63 हजार वृक्षांची कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कानपूर आणि लखनौ ही देशातील सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी एक असताना देखील योगी सरकारने वृक्ष कापण्याचा निर्णय घेतल्याने टीका करण्यात येत आहे.
वृक्षतोड करण्यात येणाऱ्या काही झाडांचे पुनर्रोपण करण्याबाबत विचार करत असल्याचे एलडीएने सांगितले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी वृक्ष तोडण्यात येणार आहे त्याच ठिकाणी पुन्हा वृक्षरोपण करण्यासाठी महापालिकेकडे 59 लाखांची मागणी करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या हवामानामुळे झाडांचे पुनर्रोपण करणं शक्य नसल्याचे एलडीएचे अध्यक्ष एम. पी. सिंग यांनी सांगितले.