लखनऊ: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विलंब होत असल्यानं संतप्त झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी उत्तर प्रदेशचं योगी सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. साधू संतांना पेन्शन देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त साधू संतांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. आतापर्यंत राज्य सरकारकडून साधू संतांना पेन्शन दिली जात नव्हती. साधू संतांकडे कागदपत्रं नसल्यानं त्यांना आतापर्यंत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात यासाठी शिबिराचं आयोजन करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. त्यामुळे वृद्धावस्थेतील साधू संतांना पेन्शन मिळू शकेल. राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.साधू संतांना पेन्शनची फारशी माहिती नसते. त्यामुळे ते अशा योजनांपासून लांब राहतात आणि यासाठी अर्जच करत नाहीत, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र आता योगी सरकारनं यासाठी साधू संतांना प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे. साधू संतांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळायला हवा, असं सरकारनं ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना या योजनांचाही सरकारकडून धडाक्यात प्रसार आणि प्रचार सुरू आहे.
साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:54 PM