लखनौ :दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकार आता अॅक्शनच्या तयारीत आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, ती ठिकाणे रिकामी करा, असा आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. एवढेच नाही, तर शेतकरी जेथे आंदोलन करत आहेत, त्यांनी आजच ती ठिकाणं सोडावीत. त्या सर्वांना घरी जाण्यासाठी सरकार मोफेत सुविधा देईल, असेही सरकारने म्हटले आहे.
यासाठी गाझीपूर सीमेवर बसेरदेखील पोहोचल्या आहेत. सध्या येथे जवळपास 1200 शेतकरी उपस्थित आहेत. यूपीमध्ये सध्या दिल्ली यूपी बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. तसेच मथुरा आणि आग्र्यात सुरू असेलेली आंदोलनं संपली आहेत. बरेली, बागपत, नोएडा आणि बुलंदशहरातीलही आंदोलनं संपुष्टात आली आहेत.यूपी गेटवर अद्यापही काही लोक -उत्तर प्रदेशचे एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी सांगितले की, 26 जानेवारीला झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर काही शेतकरी संघटनांनी स्वेच्छेने चिल्ला बॉर्डर आणि दलित प्रेरणा स्थळावरून आंदोलन मागे घेतले. बागपत येथे लोकांना समजावल्यानंतर त्यांनीही रात्री आपले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, यूपी गेटवर अद्यापही काही लोक आहेत. पण, त्यांची संख्या अत्यंत कमी आहे.राजधानी दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. यानंतर आता या आंदोलनाशी संबंधित शेतकरी संघटना स्वतःच आंदोलन संपवत असल्याच्या घोषणा करत आहेत.
दिल्ली पोलीसही अॅक्शन मोडमध्ये -ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.