लखनऊ:उत्तर प्रदेशमधीलयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील मदरसा शिक्षण परिषदेने हा निर्णय घेतला असून, यासंदर्भातील निर्देश सर्व मदरशांना देण्यात आले आहेत. जारी केलेले निर्देश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये लागू असेल, असे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशातील मदरशांना रमजानची सुट्टी होती. आता या सुट्ट्या संपल्या असून, पुन्हा मदरशांमधील शिक्षण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मदरसा शिक्षण परिषदेने ०९ मे रोजी प्रदेशातील सर्व अल्पसंख्यक कल्याण अधिकाऱ्यांना एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये २४ मार्च २०२२ रोजी झालेल्या परिषदेच्या बैठकीत मान्यता प्राप्त/अनुदानित/गैर अनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून मदरशांमधील प्रार्थनेबरोबर सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असेल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांना सूचना
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मदरशांना ३० मार्च २०२२ ते ११ मे २०२२ या कालावधीत सुट्टी असते. आता सर्व मदरशांमधील शिक्षण पुन्हा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर योगी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. अल्पसंख्यक कल्याण मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी याबाबत बोलताना, आता सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात येत आहे. यासंदर्भातील निर्देश सर्वांना देण्यात आले आहेत, अशी माहिती दिली. १४ मे पासून वार्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. नवी सत्र सुरू होणार असल्यामुळे सर्व मदरशांमध्ये विद्यार्थी येणे सुरू झाले आहे. बोर्डाने सर्व जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत, असेही अन्सारी यांनी सांगितले. तसेच या आदेशाचे पालन व्हावे यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवावी लागणार आहे.