उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2007 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे झालेल्या दंगलीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणाची याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणात गोरखपूरचे तत्कालीन खासदार आणि वर्तमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्य आरोपींपैकी एक होते. प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याचिकेमध्ये गोरखपूर दंगलीतील आदित्यनाथ यांच्या भूमिकेची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. परवेझ परवाज आणि असद हयात यांच्या याचिकेवर न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. एसी शर्मा यांच्या खंडपीठाने सुनावणीनंतर हा निर्णय दिला. हत्या, हत्येचा प्रयत्न अशा विविध कलमांखाली खटला चालवावा अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती. उत्तर प्रदेश पोलीस जाणून बुजून हे प्रकरण लटकवत ठेवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. पोलिसांच्या तपासात कोणतेही त्रुटी समोर आलेली नाही. त्यामुळे ही मागणी फेटाळून लावत असल्याचे हायकोर्टाने सांगितले. 2007 मध्ये योगी आदित्यनाथ यांना हिंसा भडकावणे आणि शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली अटक देखील झाली होती. आरोपींमध्ये भाजप आमदार राधामोहन अग्रवाल, महापौर अंजू चौधरी यांचा देखील समावेश होता. प्रक्षोभक भाषण करुन अशांतता निर्माण करणे व अन्य कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला होता.
2007 गोरखपूर दंगल : योगी आदित्यनाथांना उच्च न्यायालयाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:11 PM