ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. 14 - 'तरुणी - महिला आणि हिंदुत्वाच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणरेषा ओढणार', असल्याचं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. सोमवारी निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. योगी आदित्यनाथ नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वी हाथरस येथे बोलताना छेडछाड करणा-यांना फासावर लटकवण्यासंबंधी वक्तव्य केलं होतं. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान 15 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
'तरुणी आणि महिलांच्या छेडछाडी आणि अपहरणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पश्चिम उत्तरप्रदेशात या घटनांचं प्रमाण जास्त आहे. आपल्या मुली, महिला आणि हिंदुत्वाच्या सुरक्षेसाठी पुर्व उत्तरप्रदेशप्रमाणे येथेही आम्ही लक्ष्मणरेषा ओढू', असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. योगी आदित्यनाथ भाजपाचे उमेदवार अरुण कुमार सक्सेना यांच्यासाठी प्रचार करत होते. गेल्या निवडणुकीत अरुण सक्सेना यांनी ही जागा जिंकली होती.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर जोरदार टीका करत, 'समाजवादी पक्षाने नेहमी दहशतवादी, गुन्हेगारी आणि समाजविरोधी गोष्टींना समर्थन दिलं आहे. जर आमचा पक्ष सत्तेत आला तर आम्ही या गोष्टींवर नियंत्रण आणून गुन्हेगारी आणि असमाजिक प्रवृत्तींना कारागृहात डांबू', असं म्हटलं आहे.