नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांना बाजी मारायची आहे. भारतीय जनता पार्टीच्या (BJP) विरोधात असलेल्या सर्व पक्षांचा एकच प्रयत्न आहे की, उत्तर प्रदेशात मोदींना घेरण्याचा आणि भाजपचा पराभव करण्याचा आहे. दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दोन दिवसांपासून दिल्लीत होत असून आज संध्याकाळपर्यंत भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी येईल, असे वृत्त आहे. भाजपाने 300 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची छाननी केली असून आज दिल्लीत होणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत यापैकी 175 जागांसाठी उमेदवारांच्या नावांना ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी येईल. भाजपा आपल्या विद्यमान आमदारांची अधिक तिकिटे कापण्याच्या मनस्थितीत नाही, परंतु गेल्या निवडणुकीत भाजपाने गमावलेल्या 90 जागांपैकी निम्म्या जागांवर उमेदवार बदलले जाऊ शकतात. काही मंत्र्यांच्या जागाही बदलल्या जाऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. आज येणाऱ्या यादीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काल या मुद्द्यावर चर्चा झाली.
अयोध्या हे हिंदुत्व आणि विकास या दोन्हींचे मॉडेल आहे, त्यामुळे योगींनी तिथून निवडणूक लढवावी, यातून संपूर्ण अवध प्रदेशालाही संदेश जाईल, असे पार्टीच्या नेत्यांचे मत आहे. योगी आदित्यनाथ यांचेही नाव पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा, यूपी भाजपा अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, भाजपाचे संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष उपस्थित होते. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेश भाजपाचे प्रभारी राधामोहन या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत निवडणुका होणार असून त्याची सुरुवात 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होणार आहे. योगी आदित्यनाथ सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले होते परंतु त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व घेईल. तसेच, योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली असली तरी अंतिम निर्णय पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती (CEC) घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून उमेदवारांची नावे अंतिम केली जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या समितीचे सदस्य आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची लवकरच बैठक होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला राज्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अयोध्येव्यतिरिक्त, मथुरा आणि गोरखपूर या दोन जागा आहेत. या जागेवरून भाजपा नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास ते निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात.