नवी दिल्ली - गोरखपूर लोकसभा मतदारसंघातभाजपाकडून निवडणूक लढवत असलेले भोजपुरी अभिनेता रवी किशन सध्या एका विधानाने चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे माझे प्रभू श्री राम आहेत तर मी त्यांचा भरत आहे असं वक्तव्य अभिनेता रवी किशन यांनी केलेले आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे.
या मुलाखतीत रवी किशन म्हणतात की, गोरखपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नि:स्वार्थ भावनेने करत असलेलं कामाकडे पाहून जनता मला मतदान करेल. या मतदारसंघात मला कोणाचंही आव्हान नसून उत्तर प्रदेशातील सपा-बसपा महाआघाडीचा फ्लॉप चित्रपटासारखा फ्लॉप शो अशी स्थिती झाली आहे.
गोरखपूर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहेत. या जागेवर १९९१ पासून भारतीय जनता पार्टीने सलग विजय मिळवला आहे. मात्र २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या विजयाचं गणित बिघडलं. २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सपा उमेदवार प्रवीण निषाद यांनी भाजपाचे उमेदवार उपेंद्र दत्त शुक्ला यांचा पराभव केला होता. २०१९ मध्येही गोरखपूर मतदारसंघ पुन्हा भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाने प्रयत्न केले आहेत.
तसेच मंदिर आमची आस्था आहे आणि पार्टी देशसेवेचे माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. मी गोरखनाथ मदिरापासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. माझा प्रवास येथूनच सुरु होणार असल्याचा विश्वास रवी किशन यांनी व्यक्त केला.
काँग्रेसमधून भाजपात सहभागी झालेल्या रवी किशनला भाजपात प्रवेश केल्याने काय फायदा होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, देशभक्ती सर्वात आधी आहे. देशभक्तीची प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासून मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्हीही चौकीदार झालो आहोत. हिंदू संस्कृती आणि संस्कार यांचे रक्षण करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे जगात देशाचं नावं उंचावत चाललं आहे.