महाराष्ट्रात मशीदींवरील भोंग्यांवरून निर्माण झालेले वादळ उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम करून गेले आहे. बहुतांश मशीदींवरील, मंदिरांवरील भोंगे उतरविण्यात आले. आता हेच भोंगे परत बसविण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी दिले आहेत. परंतू हे भोंगे होते तिथे लावले जाणार नाहीत, तर ते शाळांमध्ये लावले जाणार आहेत.
योगी आदित्यनाथांनी म्हटले की, चर्चेच्या माध्यमातूनच आपल्याला अनधिकृत आणि अनावश्यक असलेले भोंगे हटविण्यात यश आले आहे. आता लाऊडस्पीकरचा आवाज संबंधित परिसरातच राहणार आहे. आम्ही एक सौहार्दाचे उदाहरण दिले आहे. ही परिस्थिती पुढेही सुरु रहावी. जर पुन्हा लाऊडस्पीकर लागले किंवा मोठ्या आवाजाची तक्रार आली तर संबंधित विभागाचे पोलिस अधिकारी, उप जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. जे लाऊडस्पीकर हटविण्यात आले आहेत ते तेथील नजीकच्या शाळांमध्ये गरजेनुसार लावण्यात यावेत, यासाठी सहकार्य करावे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येत्या ४८ तासांत राज्यातील विविध ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर वाहन स्टँड हटवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. बेकायदा टॅक्सी स्टँडच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले. स्टँडसाठी जागा निश्चित करून असे स्टँड नियमानुसार चालवावेत, असे ते म्हणाले.
रस्ते अपघातात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याबद्दल योगींनी दु:ख व्यक्त केले. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मुलांना वाहतुकीचे नियम पाळायला शिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील असे ते म्हणाले. यासाठी येत्या दोन दिवसांत शाळांमध्ये पालकांच्या बैठकाही घ्याव्यात, असेही ते म्हणाले. योगी यांनी बुधवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रस्ते सुरक्षेबाबत आढावा बैठक घेतली. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.