लखनौ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, या निकालांमुळे धक्का बसलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. मात्र आम्ही जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करतो. या पराभवाची आम्ही समीक्षा करू, असे म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचे गोरखपूर आणि फुलपूर हे मतदारसंघ रिक्त झाले होते. उत्तर प्रदेशमधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकहाती वर्चस्व राखणारा भाजपा या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सहज विजय मिळवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र परस्परांचे कट्टर वैरी असलेले सपा आणि बसपा एकत्र आल्याने भाजपासाठी ही निवडणूक अवघड झाली. अखेर या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत दोन्ही जागा सत्ताधारी भाजपाला गमवाव्या लागल्या.
" हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. मात्र आम्ही जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करतो. या पराभवाची आम्ही समीक्षा करू, विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. सपा आणि बसपामधील राजकीय सौदेबाजी देशाच्या विकासाला बाधित करणारी आम्ही त्याविरोधात रणनीती आखू, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
दरम्यान, या निकालांमुळे निराश झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही, आम्हाला समाजवादी पक्षाला (सपा) एवढे यश मिळेल, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया दिली. " या निवडणुकीत एकमेकांचे हाडवैरी असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने (बसपा) युती केली होती. मात्र, इतक्या मोठ्याप्रमाणावर बसपाची मते थेट सपाला मिळतील, याची कल्पना आम्हाला नव्हती. आम्ही संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर या सगळ्याचे व्यवस्थित विश्लेषण करू. जेणेकरून भविष्यात बसपा, सपा आणि काँग्रेस एकत्र आल्यास आम्हाला तयार राहता येईल. तसेच आम्ही 2019मधील विजयाच्यादृष्टीने रणनीती आखू, असे केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले.