Yogi Adityanath News: २२ तारखेला राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यासाठी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठा, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून राजकारणही अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप धार्मिक राजकारण करत असून, आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा वापर करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
काँग्रेसने हिंदू जनतेला मूर्ख बनवलं आणि मुस्लिम मतपेटीचाही मोह त्यांना सोडवत नव्हता. त्यांच्याकडे देशाची सत्ता दीर्घकाळ होती त्यांनी मंदिर उभारण्यासाठी काही हालचाली का केल्या नाहीत, अशी विचारणा करत, १९८९ मध्ये काँग्रेसने प्रचाराचा नारळ अयोध्येतून फोडला होता. मतपेटीचे राजकारण रामाचे नाव घेऊनच केले. आता ते आमच्यावर आरोप करत आहेत, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
आम्ही राजकारण केले नाही, जनता आमच्या बरोबर आहे
आम्हाला राम मंदिर उभारले जावे यासाठी न्यायालयात दाद मागावी लागली. स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. आता राम मंदिर उभे राहत आहे. आम्ही राजकारण केले नाही. देशाच्या आस्थेनुसार आम्ही वागलो. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच अयोध्येत सर्व काही शास्त्रांनुसार होत आहे. मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते. त्यानंतर अनेक शुभ मुहूर्त असतात. त्यानुसारच रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाते आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.
दरम्यान, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य कुणीही प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचे म्हणणं मांडलं आहे. त्यांनी जरुर या सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे, असे आग्रहाचे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.