“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 03:28 PM2022-05-31T15:28:08+5:302022-05-31T15:29:01+5:30
विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर गोमातेच्या कल्याणाची भाषा ते बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.
लखनऊ: दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. तसेच विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचारही घेतला. यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात जास्त फरक नसल्याचा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला.
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे राहुल गांधी देशाबद्दल वाईट बोलतात आणि अखिलेश यादव प्रदेशाबद्दल, अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात बोलताना, एकदा एका शाळेत गेलो होतो. तेव्हा तेथील मुलांना विचारले की, तुम्ही मला ओळखता का, या प्रश्नावर मुलांनी होकारार्थी मान डोलावून तुम्ही राहुल गांधी आहात, असे म्हटले, असा मजेशीर किस्सा अखिलेश यादव यांनी सभागृहात सांगितला. यानंतर सर्व सदस्य मनमोकळेपणाने हसले. हाच धागा पकडून योगी आदित्यनाथ यांनी टोलेबाजी केली.
लहान मुले भोळी-भाबडी असतात, ते नेहमी खरे बोलतात
यावर बोलताना लहान मुले भोळी-भाबडी असतात. मुले नेहमी सत्यकथन करतात, खरे बोलतात. त्यांनी विचारपूर्वकच उत्तर दिले असणार. तसे पाहता तुमच्यात आणि राहुल गांधींमध्ये फार जास्त फरक नाही. ते देशाबद्दल वाईट बोलतात आणि तुम्ही प्रदेशाबद्दल, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी टोला लगावला. अखिलेश यादव यांच्या गोमयाबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आताच्या काळात गोमयापासून अगरबत्तीही बनवल्या जात आहेत. मला वाटले की, जर तुम्ही घरी पूजा करत असता, तर तुम्ही अगरबत्ती लावत असाल. मला वाटते की, विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर ते गोमातेच्या कल्याणाची भाषा बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून चालवणाऱ्या जाणाऱ्या योजनांवर चर्चा झाली. विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की, हा समाजवाद आहे. मात्र, यानिमित्ताने का होईना, विरोधकांनी पंतप्रधानांच्या गरीब कल्याण कार्यक्रमाचे कौतुक केले, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.