नवी दिल्ली - कोरोना व्हायरस या महामारीशी दोन हात करण्यासाठी उत्तर प्रदेशातीलयोगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपने एकत्र येऊन लढा देण्याचे निश्चित केले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी योगींनी भाजप संघटनाकडे मदत मागितली आहे. राज्यातील भाजपच्या बुथ अध्यक्षांनी दररोज दहा गरीबांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश योगी यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या १ लाख ६३ हजार कार्यकर्त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या पॅकेजविषयी माहिती दिली.
योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, राज्यातील भाजपच्या प्रत्येक बुथअध्यक्षाने आपल्या गावातील किंवा गल्लीतील दहा कुटुंबांशी संपर्क करावा. त्या प्रत्येक कुटुंबाकडून एक पॅकेट जेवण बनवून दररोज दहा गरीबांना त्याचे वाटप करण्याचे. तसेच लॉकडाउनमध्ये परराज्यातून उत्तर प्रदेशात येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेशही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कोरोना हरणार, भारत जिंकणार’ या अभियानाअंतर्गत सर्वांनी मानवतेची सेवा करावी. तसेच पंतप्रधान मोदींनी गरिबांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती गरिबांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन देखील योगींनी केले.
उत्तर प्रदेशात योगी सरकार कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय़ घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील मनरेगा मजुरांच्या खात्यावर योगी सरकार प्रत्येकी ६०० रुपये ट्रान्सफर करण्याच्या विचारात आहे. कोरोना व्हायरसाचा वाढता प्रसार पाहता योगींनी आधीच राज्यातील २० लाखांहून अधिक मजुरांच्या खात्यांवर प्रत्येकी एक हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत.