लखनऊ - गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (बीआरडी) 48 तासात 30 बाळांचा मृत्यू झाला आहे. डिपोर्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसीनचे प्रमुख डॉ डी के श्रीवास्तव यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. 'मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 15 बाळांना एक महिनाही पुर्ण झाला नव्हता. उर्वरित 15 बाळांपैकी सहाजण ज्यांना एक महिना पुर्ण झाला होता त्यांचा मेंदूला सूज आल्याने मृत्यू झाला. तर इतरांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला', अशी माहिती डॉ डी के श्रीवास्तव यांनी दिली आहे.
याआधीही गोरखपूर हॉस्पिटल चर्चेत आलं होतं, जेव्हा फक्त सहा दिवसांत 60 मुलांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर समाजवादी पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करत निषेध नोंदवला आहे.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ता सुनील यादव बोलले आहेत की, 'गोरखपूरमध्ये अशी घटना होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या घटनेनंतरही राज्य सरकारने चौकशी करण्यासाठी कोणताही आदेश दिला नसून, काहीच हालचाल करताना दिसत नाहीयेत. सरकार निष्क्रीय असल्याचं पाहून दुख: होतंय. सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार शांत बसून सर्व पाहत आहे'.
'राज्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळांचा दौरा करण्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांनी गंभीरपणे लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याकडे त्यांनी लक्ष द्यावं', असं सुनील यादव बोलले आहेत.
बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या महिन्यात चार दिवसांमध्ये ६९ मुलांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या नोंदीनुसार १० ऑक्टोबर रोजी १९, नऊ तारखेला १८, आठ तारखेला २० आणि १२ मुलांचा मृत्यू ७ ऑक्टोबरला झाला.
ऑगस्टमध्ये २९० बालमृत्यू झाले. त्यापैकी एका दिवसात ६० मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांना प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या रुग्णालयाला प्राणवायूच्या सिलिंडरचा पुरवठा करणाºयाचे बिल दिले न गेल्यामुळे त्याने पुरवठा थांबवला, असाही आरोप आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला व चौकशीही झाली. आॅक्सिजन पुरवठादाराला अटकही झाली होती.