काँग्रेस खासदार प्रियंका गांधी सोमवारी संसदेत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बॅग घेऊन पोहोचल्या होत्या. यानंतर भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील एका नेत्याने त्यांचं कौतुक केलं. याच दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधींनी पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग संसदेत घेऊन येण्यावरून हल्लाबोल केला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्या पॅलेस्टाईनची बॅग घेऊन फिरत आहेत आणि आम्ही आमच्या तरुणांना इस्रायलला पाठवत आहोत. आतापर्यंत यूपीतील ५६०० हून अधिक तरुण इस्रायलला गेले आहेत. तिथे बांधकाम करण्यासाठी त्यांना मोफत राहण्याची सोय आणि महिन्याला दीड लाख रुपये पगार मिळत आहे.
प्रियंका गांधी पॅलेस्टाईन असं लिहिलेली बॅग घेऊन संसदेत पोहोचल्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता. प्रियंका यांना बांगलादेशी हिंदूंचं दुःख दिसत नाही, असं म्हटलं होतं. यानंतर मंगळवारी प्रियंका गांधी बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ एक बॅग घेऊन संसदेत गेल्या. नवीन बॅगवर बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ घोषणा लिहिल्या होत्या.
योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना कोंडीत पकडलं आणि आज सरकार युवकांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचं सांगितलं. पेपरफुटीबाबत आम्ही अध्यादेश काढला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आरक्षणाच्या नियमाने तरुणांना नोकरी मिळावी यासाठी काम केलं जात आहे. पोलीस दलात १ लाख भरती झाल्या आहेत, अजूनही ६० हजारांहून अधिक भरती सुरू आहेत. आतापर्यंत विविध विभागांमध्ये ७ लाखांहून अधिक सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असल्याचं म्हटलं आहे.