'काँग्रेसची शहजादी' लहान मुलांना शिकवतेय शिव्या, योगींचा प्रियंका गांधींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 10:35 AM2019-05-04T10:35:54+5:302019-05-04T10:44:17+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी यांनी प्रियंका यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख हा 'काँग्रेसची शहजादी' असा केला आहे.
रायबरेली/फतेहपुर/बांदा - राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी यांनी प्रियंका यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख हा 'काँग्रेसची शहजादी' असा केला आहे. शक्रवारी (3 मे) फतेहपूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधीवर टीका केली आहे.
'ज्या वयात लहान मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत, 'काँग्रेसची शहजादी' त्यांना शिव्या द्यायला शिकवत आहे... हेच काँग्रेसचं खरं चरित्र आहे' असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमोर अमेठीत काही लहानग्यांनी 'चौकीदार चोर है'ची घोषणा दिली होती. लहान मुलं चौकीदार चौर हैच्या घोषणा देत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
प्रियंका गांधी यांच्या विरोधात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियंका गांधींची तक्रार केली होती. व्हायरल झालेला व्हिडीओ हा 1 मे रोजीचा आहे. व्हिडीओवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनीही प्रियंका गांधींवर टीका केली होती. व्हिडीओमध्ये लहान मुलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करत असल्याचं ऐकायलं मिळतं.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं व्हिडीओसंदर्भात लिहिलं होतं की, प्रियंका गांधी यांच्या समोर लहान मुलं ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत आहे, त्यांना शिवीगाळ करत आहेत, ती मुलांच्या विकासासाठी चांगली गोष्ट नाही. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला पत्र लिहून लहान मुलांना निवडणूक प्रचार आणि निवडणुकीसंदर्भातील गोष्टींमध्ये सामील करू घेऊ नये, हे तुम्ही सुनिश्चित करण्याचं सुचवलं आहे. लहान मुलांचा वापर कोणतीही चिठ्ठी, घोषणबाजी आणि रॅलीमध्ये केला जाऊ नये, अशी मागणीही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं केली होती. तसेच या प्रकरणात प्रियंका गांधींवर कारवाई करावी, असंही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)नं निवडणूक आयोगाला म्हटलं होतं.