मुंबई - वरळी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बॉम्ब तसेच धमकीच्या फोनचे सत्र सुरूच असून, शनिवारी आणखी एका फोनने खळबळ उडाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसांत राजीनामा न दिल्यास त्यांना माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे ठार मारू, अशी धमकी देण्यात आली होती. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास करून उल्हासनगरमधून एका २४ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले.
ही तरुणी माहिती तंत्रज्ञान विषयात बीएससी आहे. ती उल्हासनगर येथे कुटुंबीयांसह राहते. तिचे वडील लाकडाचा व्यवसाय करतात, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही तरुणी सुशिक्षित असली तरी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने तिची चौकशी सुरू असल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर अभिनेता सलमान खान, आमदार झिशान सिद्दीकी यांना दोन व्यक्तींनी धमकी दिली होती. त्यापैकी एकाला झारखंड, तर दुसऱ्याला वांद्रे येथून अटक करण्यात आली.
काय धमकी दिली?योगी आदित्यनाथ यांनी येत्या १० दिवसांत उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास त्यांना माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे ठार मारू, अशी धमकी देण्यात आली.
काय घडले?- वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन क्रमांकावर शनिवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास अनोळखी मोबाइल क्रमांकावरून योगी यांना धमकी देण्यात आली. - नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. - त्यानुसार, प्रथम अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आणि या धमकीचा फोन उल्हासनगरातून आल्याचे स्पष्ट झाले.