नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) भाजपने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) रविवारी म्हणजेच उद्या दिल्लीत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशामध्ये स्थापन होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी दोन्ही नेत्यांना आमंत्रित करणे, हा या बैठकीचा उद्देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात नवीन सरकारच्या शपथविधी सोहळा होळीनंतर होणार आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पहिला कार्यकाळ संपला आणि त्यांनी लखनऊच्या राजभवनात औपचारिकपणे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाला आहे.
भाजपने जिंकल्या 255 जागाउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये (UP Election Result) निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री उशिरा 403 जागांवर निवडणूक निकाल जाहीर केला, ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह 273 जागा जिंकल्या आणि पूर्ण बहुमत मिळवले. या निवडणुकीत भाजपने 255 जागा जिंकल्या, तर अपना दल 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या. याचबरोबर, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने 111 जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपला 41.29 टक्के, तर समाजवादी पक्षाला 32.06 टक्के आणि बहुजन समाज पक्षाला 12.88 टक्के मते मिळाली आहेत.
योगी आदित्यनाथ जिंकले, केशव प्रसाद मौर्य पराभूतमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहर (Yogi Adityanath win from Gorakhpur Sadar) विधानसभेची जागा एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकली. मात्र, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघात सात हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी पराभव केला. पल्लवी पटेल यांना 1,06,278 मते मिळाली तर केशव प्रसाद मौर्य यांना 98,941 मते मिळाली.