राजकारणात कायमस्वरुपी काहीच नसते असे म्हणतात. आज जो राजा आहे तो उद्या प्यादा बनेल किंवा आजचा प्यादा उद्या राजा बनेल, काही सांगता येत नाही. उत्तर प्रदेशमध्ये यापेक्षा खूप लवकर अशी परिस्थिती आली आहे. योगी आदित्यनाथ २५ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. परंतू सध्या राजकीय वर्तुळात मंत्रिपदासाठी एका नावाची जोरदार चर्चा आहे. एवढ्या लवकर कोणी पारडे बदलेल असे वाटत नसताना हा नेता भाजपविरोधात लढला तरी त्याला मंत्रिपद मिळण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले ओमप्रकाश राजभर यांच्या नावाची पुन्हा मंत्रिपदासाठी चर्चा सुरु झाली आहे. तसे पाहता भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. यामुळे त्यांना आपल्या मित्रपक्षांनाचा सत्तेत सहभागी करणे बंधनकारक आहे. परंतू राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा) हा अखिलेश यादवांच्या सपा आघाडीत गेला होता. भाजपा विरोधात लढला होता. या राजभर यांना देखील भाजपा आघाडीत सहभागी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
ओमप्रकाश राजभर पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्यास तयार आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत धर्मेंद्र प्रधान, सुनील बंसल यांच्याशी चर्चा केली आहे. ओमप्रकाश यांना सुभासपाच्या कोट्यातून योगी मंत्रिमंडळात मंत्री पद दिले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश राजभर यांनी 18 मार्च रोजी अमित शाह, धर्मेंद्र प्रधान आणि सुनील बन्सल यांची भेट घेतली होती. या नेत्यांसोबत ओमप्रकाश राजभर यांची भेट सुमारे तासभर चालली. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या संदर्भात भाजप किंवा ओमप्रकाश राजभर यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.