Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) २५ मार्च रोजी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. २५ मार्च रोजी लखनौमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर योगी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा अनेक अर्थांनी खास असेल. भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांनाही या सोहळ्याला बोलावण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, संघ आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर प्रस्तावित शपथविधी सोहळ्यासाठी सरकारनं तयारीही सुरू केली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी बसपा सुप्रीमो मायावती, सपाचे मुलायम सिंह यादव, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. शपथविधी सोहळा इकाना स्टेडियमवर होणार असल्याचं माहिती विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी सांगितलं. दरम्यान, मंत्रिमंडळात महिला आणि तरुणांनाही योग्य संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.