लखनौ - प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना 4 मार्चनंतरही सुरूच राहणार असल्याची घोषणा अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यानंतर, कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला(PM Garib Kalyan Anna Yojana) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली. मात्र, आता उत्तर प्रदेशात ही योजना आणखी पुढे चालूच राहणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.
अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूकांपूर्वीच राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली होती. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्यात आले होते. योगी आदित्यनाथ यांनी मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये घेतला आहे. त्यानंतर, केंद्र सरकारनेही ही योजना मार्च महिन्यापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत आहे.
मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा ताण कमी करणे हा आहे. आता, भाजपला 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं असून युपीतही स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळेच, गरिबांसाठीची ही योजना यापुढेही उत्तर प्रदेशात सुरू राहणार आहे. लवकरच सरकार स्थापन होणार असून पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आहे. यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सने उत्तर दिलंय.
योजनेचा लाभ कोणाला आणि किती मिळतो?
केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत, भारतातील सुमारे 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना दरमहा 5 किलो अधिक धान्य(गहू-तांदूळ) दिले जाते. देशातील ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 5 किलो अतिरिक्त रेशन त्याच्या कोट्यातील रेशनसह मिळत आहे. पण, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
योजनेचा लाभ न मिळाल्यास तक्रार करू शकता
जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि रेशन विक्रेते या योजनेअंतर्गत तुमच्या कोट्यात धान्य देण्यास नकार देत असतील तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल वर प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही NFSA वेबसाइट https://nfsa.gov.in वर जाऊन मेल लिहून तक्रार नोंदवू शकता.