मथुरा : बरसानाच्या टेकडीवर लाडली जी मंदिरातून बाहेर पडत असताना घाटामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारला अपघात झाला. आदित्यनाथ प्रवास करत असलेली कार रस्त्याकडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळली. कमी वेग असल्याने ही कार दरीमध्ये कोसळता कोसळता वाचली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
लाडली जी मंदिराचा रस्ता घाट रस्ता आहे. मंदिरातून खाली उतरताना हा अपघात झाला. ज्या वळणावर हा अपघात झाला त्या भिंतीच्या पलिकडे खोल दरी आहे. योगी आदित्यनाथ यांना कोणतीही दुखापत झालेली नसून त्यांना दुसऱ्या गाडीमध्ये बसवून मार्गस्थ करण्यात आले.
बरसाना लाडू होळीमध्ये सहभागी होण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले आहेत. दुपारी 12.30 वाजता ते लाडली मंदिरामध्ये टाटा सफारी कारमधून आले होते. त्यांच्या कारचा ताफा राधा बिहारी इंटर कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला जात होता. यावेळी त्यांच्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार संरक्षण भिंतीवर आदळली. वेग कमी असल्याने भिंत तुटली नाही. अन्यथा खोल दरीमध्ये आदित्यनाथांची कार कोसळली असती, असे पोलिसांनी सांगितले.
या अपघातामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. आदित्यनाथांच्या कारची हेडलाईट फुचली असून कारचा पत्रा वाकला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कारमध्ये उर्जा मंत्री श्रीकांत शर्मा देखील होते.