ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 19 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भलेही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक मानलं जात असलं तरी उत्तराखंडमध्ये त्यांच्याद्वारे उभारण्यात आलेल्या डिग्री कॉलेजात मुस्लिम मुख्याधापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 1999 रोजी योगी आदित्यनाथ यांनी पौडी जिल्ह्यात महायोगी गुरुगोरखनाथ डिग्री कॉलेज सुरु केलं होतं. उत्तराखंडमध्ये भाजपा सरकार आल्यानंतर सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये या कॉलेजचा समावेश करण्यात आला.
आफताब अहमद या कॉलेजचे मुख्याधापक आहेत. "वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कॉलेजात जात, धर्म, रंगाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जात नाही. आमचं कॉलेज निसर्गामधील वातावरणासारखं स्वच्छ आहे", असं आफताब अहमद सांगतात. आफताब अहमद यांच्या कार्यालयात स्वातंत्र्य सैनिकांपासून ते हिंदू देवी देवतांपर्यंत सर्वांचेच फोटो आहेत.
आफताब अहमद देहरादूनचेच राहणारे आहेत. त्यांनी सांगितलं की, "कॉलेजमध्ये एकूण 150 विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. 2005 रोजी कॉलेजचा एचएनबी गढवाल महाविद्यालयामध्ये समावेश करण्यात आला. कॉलेजात देशभरातील उत्तम शिक्षक शिकवतात. जिल्ह्यात असणारं हे एकमेव कॉलेज आहे. येथून सर्वात जवळचं कॉलेज 50 किमी दूर ऋषिकेश येथे आहे".
आफताब अहमद यांची 2014 रोजी मुख्याधापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. "उत्तम शिक्षा देणे तसंच तरुणांना माणुसकी आणि सहिष्णुतेचे धडे देणं आमचा मुख्य उद्धेश असल्याचं", आफताब अहमद सांगतात.
योगी आदित्यनाथ यांचे बंधू महेंद्र सिंह बिष्ट कॉलेजचे प्रमुख असून सर्व कारभार सांभाळतात. आपल्या कॉलेजात भेदभावाला काही जागा नसल्याचं त्यांना सांगितलं.