'देशाबाहेर ख्रिश्चन असल्याचं सांगतात आणि देशात आल्यावर जानवेधारी हिंदू होतात', योगी आदित्यनाथांची राहुल गांधींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 04:54 PM2017-12-02T16:54:16+5:302017-12-02T19:59:26+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.
लखनऊ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे. यावेळी राहुल गांधी जानवेधारी हिंदू असल्याचं सांगण्यात येत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हा सगळा मुर्खपणा असल्याचं सांगितलं.
'काँग्रेसने नेहमीच समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांना समाजात तेढ निर्माण केलं आणि आता हिंदूंना विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे', असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 'हिंदूंमध्ये कोणीही तुम्ही जानवे घातलं आहे का असं विचारत नाही, हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. पण एखादी व्यक्ती देशाबाहेर गेल्यावर ख्रिश्चन असल्याचं सांगते आणि इथे आल्यावर जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत असेल तर हा मुर्खपणा आहे', असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. 'हे सगळं ती व्यक्ती म्हणत आहे, ज्याच्या पक्षाने कधीच राम आणि कृष्णाचं अस्तित्व मान्य केलं नाही. गुजरातच्या जनतेने राहुल गांधींना मंदिरात जायला आणि आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगायला भाग पाडलं', असा टोला योगी आदित्यनाथांनी लगावला आहे.
गुजरात निवडणुकीत जीएसटीचा मुद्दा उपस्थित करण्याबद्दल विचारलं असता योगी आदित्यनाथ बोलले की, 'राहुल गांधींचं वय 46-47 झालं आहे, पण अजून त्यांना काहीच समजत नाही. त्यांना जे वाचायला दिलं जात, तेच पुढे रेटतात, तेच बोलतात. आपण काय बोलतोय, त्याचा अर्थ काय हे त्यांना स्वत:ला माहिती नसतं'. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कार्यकर्त्यांना दिलं आहे.
उत्तर प्रदेश महापालिका निवडणुकीत भाजपाला जबरदस्त यश मिळालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली असून, 16 पैकी 14 शहरांची महापौरपदे भाजपाकडे गेली आहेत. दोन महापौरपदे बहुजन समाज पार्टीकडे गेली असून, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा पराभव झाला आहे. गुजरात निवडणुकीआधी हा निकाल काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी मात्र स्थानिक निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. ज्याचं सरकार आहे त्यांचा दबदबा जास्त असतो असं सांगत याचा गुजरात निवडणुकीवर परिणाम होणार नाही असा दावा केला आहे.