उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ओसडी मोतीलाल सिंह यांच्या गाडीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये मोतीलाल यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
ड्रायव्हरचे एसयुव्हीवरून नियंत्रण सुटले आणि कार हायवेच्या बाजुच्या झाडावर जाऊन आदळली. पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला. गोरखपुर-लखनऊ चौपदरी हायवेवर हा अपघात झाला आहे. चालकाला झोप आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मोतीलाल सिंह हे गोरखपूरहून लखनौला जात होते. चालकाला डुलकी आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याकडेच्या झाडावर आदळून शेजारच्या खड्ड्यात पडली. यात मोतीलाल आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मोतीलाल यांना मृत घोषित केले. तर पत्नीला गोरखपुर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये नियुक्त असलेले OSD मोतीलाल सिंह यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. गोरखपूर महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदावरून ते निवृत्त झाले होते. गोरखनाथ मंदिरात लोकांच्या तक्रारी ऐकणे आणि सोडविणे हे त्यांचे काम होते.