लखनऊ- डाव्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या केरळच्या राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी भाजपाकडून आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी 'जनरक्षा यात्रा' सुरू केली आहे. अमित शहा यांनी मंगळवारी केरळ यात्रेला सुरूवात केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजपासून केरळच्या मैदानात दाखल होणार आहेत. आक्रमक भाषण करण्यासाठी योगी आदित्यनाथ प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांना केरळमधील यात्रेत उतरविण्यात येणार आहे.
आजपासूनच योगी आदित्यनाथ जनरक्षा यात्रेत सहभागी होत असून कन्नूर जिल्ह्यातील कचहरीपासून ते कन्नूरपर्यंत ९ किलोमीटरच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि सीपीआयचे राज्य सचिव के. बालकृष्णन यांच्या जिल्ह्यातील पदयात्रेत योगी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे केरळमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रचाराला यावं अशी केरळ भाजपाचीही मागणी होती. केरळमध्ये अनेक मुद्द्यांवर भाजपाची गोची झाली आहे. विशेष म्हणजे ज्या मुद्द्यांवर केरळमधील भाजपा संघर्ष करत आहे, त्या मुद्द्यांवर योगी आदित्यनाथ यांनी काम केलेलं आहे. केरळ भाजपाच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये योगी आदित्यनाथ बरेच लोकप्रिय आहेत. यामुळे योगी आदित्यनाथ यांचं केरळमधील यात्रेत सहभाग घेणं फायद्याचं ठरणार आहे.
गुरूवारी अमित शहा पुन्हा पदयात्रेत सहभागी होती. यावेळी ते केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्या गावापर्यंत जातील. पुढे योगी आदित्यनाथ यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरही या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, आदित्यनाथ यांना केरळशिवाय देशातील इतर राज्यातही स्टार प्रचारक म्हणून पाठवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यानुसार १३-१४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 'गुजरात गौरव यात्रे'त सहभागी होऊन योगी रोड शो करणार आहेत.