ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची वर्णी लागल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र भारतातच नव्हे तर पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे धक्का बसला आहे. पाकिस्तानी मीडियात उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांच्या निवडीवरून खळबळ उडाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानमधल्या अनेक वृत्तपत्रांसह वृत्तवाहिन्यांनी योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानमधल्या डॉन वृत्तपत्रात योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदू म्हणून संबोधत मुस्लिम विरोधी असल्याचंही म्हटलं आहे. भारतातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यात हिंदू कट्टरतावादी मुख्यमंत्र्याची निवड करण्यात आल्याचंही डॉननं म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांची भाजपाकडून एकमताने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदीच निवड करण्यात आली आहे. आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून योगी आदित्यनाथ हे सर्वांनाच परिचित आहेत. गढवाल विद्यापीठातून आदित्यनाथ यांनी बीएस्सीची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली. नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन ते संन्यासी झाले. गुरू अवैद्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करत असत. हिंदू वाहिनी नावाची संस्था उभारुन त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा विस्तार केला. हिंदू वाहिनी म्हणजे हिंदू युवकांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी गट आहे. त्याप्रमाणेच योगी आदित्यनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा अनेकदा अडचणीत सापडली असून, विरोधकांना भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्ञात आहेत. त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगे पसरवणे, हत्येचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, चिथावणी देणे, धमकी देणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे.
योगी आदित्यनाथांची यूपीच्या सीएमपदी निवड केल्यानं पाकमध्ये खळबळ
By admin | Published: March 19, 2017 9:55 PM