नवी दिल्ली - उत्तरप्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. कायदा सुव्यवस्थेबाबत प्रियंका गांधी यांनी योगींवर केलेल्या टीकेला आता योगी आदित्यनाथ यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. दिल्ली, इटली किंवा इंग्लंडमध्ये बसून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल त्यामुळे काहींना काही गोष्टी करत राहणे पसंद आहे. अशी टीका योगींनी केली आहे.
प्रियंका गांधी यांचा समाचार घेत योगी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील पराभव प्रियंका गांधींना खूप जिव्हारी लागला आहे. म्हणून त्या उत्तरप्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला मोठ्याप्रमाणात अपयश आले आहे. प्रियंका यांचे भाऊ आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या अमेठी मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे अश्यात, इटली किंवा इंग्लंडमध्ये बसून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल, म्हणूनच प्रियंका ह्या उत्तरप्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलत असल्याचा टोला योगी यांनी लगावला आहे.
वाढत्या गुन्हेगारीमध्ये योगी सरकार अपराध्यांना शरण गेलं आहे. गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत, गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही, पण भाजप सरकारच्या कानांवर कोणतीच गोष्ट येत नाही. उत्तर प्रदेश सरकारने आत्महत्या केली आहे का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला होता.