चंदौली- योगी सरकारमधील केंद्रीय मंत्री ओमप्रकाश राजभर यांचा मुलगा आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते अरविंद राजभर यांचं एक वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आलं आहे. 'आमचा पक्ष जर सत्तेत आल्यावर मुलींना चुकीचा स्पर्श करणाऱ्याचे हात तोडून टाकीन', असं वादग्रस्त विधान अरविंद राजभर यांनी केलं आहे.
'जो कुणी महिला किंवा मुलींना चुकीच्या प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल, त्याचे हात तोडून टाकीन. पक्ष सत्तेत आल्यावर यासाठी कठोर पावंल उचलली जातील', असं अरविंद राजभर यांनी म्हटलं आहे. चंदौली येथिल एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे.
योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभरसुद्धा काही दिवसांपूर्वी त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजभर सतत त्याच्याच सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजभर यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी कुठलेही वाद नसल्याचं वक्तव्य केलं होतं. योगी माझे कॅप्टन आहेत व त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.