लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज जिन्नांना पाठिंबा देणारे एकप्रकारे तालिबानचे समर्थक आहेत, अशी जहरी टीका आदित्यनाथ यांनी केली. यावेळी त्यांनी नाव न घेता अखिलेश यांच्यावर निशाणा साधला.
भारतीय जनता पक्ष मागास मोर्चाने आयोजित केलेल्या 'सामाजिक प्रतिनिधी परिषदे'च्या कार्यक्रमात मौर्य, कुशवाह, शाक्य, सैनी समाजाच्या प्रतिनिधींना संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'जिन्नांना पाठिंबा देणारे एकप्रकारे तालिबानचे समर्थक आहेत. तालिबानचा पाठिंबा म्हणजे मानवताविरोधी शक्तींना पाठिंबा. तालिबानला पाठिंबा देणे हा बुद्धाचा शांतता आणि मैत्रीचा संदेश थांबवण्याच्या कटाचा एक भाग आहे. काही लोक त्या दिशेने वाटचाल करत आहेत, आपण त्यांच्यापासून सावध राहू.'
तालिबानच्या क्रूरतेची आठवणयोगी पुढे म्हणाले की, 'जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचे शोषण करते, तेव्हा समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या इतिहास आपल्याला शिकण्याची प्रेरणा देतात. अफगाणिस्तानातील बामियान येथे तालिबान्यांनी बुद्धांची मूर्ती फोडली होती, तेव्हा तालिबानचा क्रूरपणा जगाने पाहिला. शांतता आणि करुणेच्या महामानवाच्या पुतळ्याची तालिबान्यांनी कशी तोडफोड केली, हे कधीही विसरता कामा नये. बुद्ध मूर्ती तोडणे म्हणजे शांतता आणि करुणा भंग करणे होय आणि या वृत्तीचे समर्थन म्हणजे चुकचीचे आहे,'असेही ते म्हणाले.
अखिलेश यांनी जिन्नांना स्वातंत्र्यसैनिक म्हटलेकाही दिवसांपूर्वी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हरदोई येथील सभेत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कौतुक केले होते. तसेच, मोहम्मद अली जिन्ना यांचेही नाव घेत, त्यांचा स्वातंत्रसैनिक असा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.