उत्तर प्रदेशचं योगी आदित्यनाथ यांचं सरकार लवकरच फॅमिली कार्ड (Family Card) योजना लॉन्च करणार आहे. या कार्डच्या माध्यमातून राज्यातील जनतेला विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. फॅमिली कार्ड आलं की इतर कोणत्याही वेगवेगळ्या कार्ड्सची गरज भासणार नाही. यूपी सरकार फॅमिली कार्डच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची तयारी सुरू करणार आहे. फॅमिली कार्ड हे कुटुंबाचं ओळखपत्र असणार आहे. यातून कुटुंबातील सदस्याची माहिती आणि ओळख पटवण्यात सोपं जाईल. एखाद्या कुटुंबाला कोणकोणत्या सरकारी योजनांचा फायदा मिळत आहे याची माहिती देखील याच कार्डच्या माध्यमातून मिळवता येणार आहे. कार्डच्या माध्यमातूनच कुटुंबांना स्कीमचा लाभ घेता येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार फॅमिली कार्ड हे राशन कार्डच्या धर्तीवर तयार केलं जाईल जेणेकरुन ६० टक्के कुटुंबांचं मॅपिंग सहजपणे होईल आणि काही दिवसांत फॅमिली कार्ड तयार करण्याचं काम पूर्ण होऊ शकेल. या स्कीमची चाचपणी प्रयागराजमध्ये करण्यात आली आहे. यात राशन डेटा वापरण्यात आला आहे. या चाचपणीत लाभार्थ्यांची मॅपिंग केली गेली. कोणकोणत्या कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे याची माहिती यातून जाणून घेण्यात यश देखील आलं आहे.
फॅमिली कार्डने काय होणार?सरकारच्या दाव्यानुसार फॅमिली कार्डमुळे बनावट कार्ड निर्मिती थांबवली जाईल. एकाच व्यक्तीला वारंवार एकाच योजनेचा फायदा मिळण्यापासून रोखलं जाऊ शकेल. निवडणुकीत भाजपानं युपीच्या जनतेला प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता फॅमिली कार्डच्या मदतीनं कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार देणं आणि त्याची माहिती ट्रॅक करणं सरकारला सोपं जाईल. कुटुंबात कुणाला रोजगाराची गरज आहे आणि कुणाला नाही याची माहिती मिळवणं सोपं जाईल. समजा एका व्यक्तीनं फॅमिली कार्ड तयार केलं आहे आणि त्यानं जात प्रमाणपत्र त्यास जोडलं आहे. तर कुटुंबातील इतर सदस्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही. घरातील कोणत्याही एका सदस्याच्या जात प्रमाणपत्रावरुन इतर सदस्यांची माहिती मिळवता येईल.
फॅमिली कार्डचा फायदा काय?राज्य पातळीवर ज्या ज्या योजना चालवल्या जातात त्या सर्व फॅमिली कार्डशी जोडण्यात येतील. ज्या व्यक्तीला शिष्यवृत्ती, सब्सिडी आणि पेन्शन इत्यादी सुविधा हव्या आहेत. त्यांना फॅमिली कार्डच्या माध्यमातून लाभ मिळवता येईल. कोणत्याही व्यक्तीकडे फॅमिली कार्ड असेल तर त्याला मॅरेज सर्टीफिकेट, इन्कम आणि डोमिसाइल सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र हवं असेल तर सहज शक्य होईल. त्यानंतर असा नियम करण्यात येईल की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पद्धतीचं प्रमाणपत्र तयार करायचं असेल तर फॅमिली कार्ड बनवावं लागेल. याच फॅमिली कार्डमध्ये कुटुंबाची सर्व माहिती आणि प्रमाणपत्राची निगडीत सर्व माहिती अपडेट केली जाईल. वाहनाच्या आरसी आणि लायसन्ससाठी देखील फॅमिली कार्ड अनिवार्य केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.